Saturday, December 31, 2022

ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राला सलग आठवा दुहेरी मुकुट


ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राला सलग आठवा दुहेरी मुकुट

उस्मानाबादच्या किरण वसावेला वीर अभिमन्यू, तर सोलापूरच्या प्रीती काळेला जानकी पुरस्कार  


प्रीती काळे

 अहमदनगर : पश्चिम बंगालमधील बन्स
बेरिया (जि. होगळी) येथे आयोजित 41 व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी ओडिशाला, तर मुलांनी दिल्लीला नमवून दुहेरी सुवर्णमय कामगिरी केली. महाराष्ट्राचा हा सलग 18वा दुहेरी मुकुट ठरला असून, मुलांमध्ये  33 वे, तर मुलींचे 24 वे अजिंक्यपद आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार उस्मानाबादच्या किरण वसावेला वीर अभिमन्यू, तर सोलापूरच्या प्रीती काळेला जानकी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

किरण वसावेला

बन्सीबेरी येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर ही स्पर्धा पार पडली. मुलींमध्ये महाराष्ट्राने ओडिशाचा 16-10, असा 6 गुणांनी धुव्वा उडवत अजिंक्यपदाला गवसणी घातली. महाराष्ट्रातर्फे प्रीती काळे (2.30, 2 मि. संरक्षण व 4 गुण), दीपाली राठोड (2.20, 2 मि. संरक्षण व 2 गुण), संपदा मोरे (1.50, 2 मि. संरक्षण व 3 गुण), वृषाली भोये (3 गुण) यांच्यासह कर्णधार अश्विनी शिंदे (1.20, 2 मि. संरक्षण) यांनी विजयात बहारदार कामगिरी करत सलग विजेतेपदाचा धडाका कायम ठेवला. प्रीती काळेने पाचव्या गुणासाठी ओडिशाला चांगलेच झुंजवले. पराभूत ओडिशातर्फे शुभश्री (2.10, 1.10 मि. संरक्षण व 1  गुण), स्मरणिका (1, 2.40 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजयश्रीने यशाचे दान महाराष्ट्राच्या पराड्यात टाकले.  

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीवर 22-14, असा 8 गुणांनी विजय मिळविला. यामध्ये  किरण वसावे (1.50, 2.10 मि. संरक्षण व 3 गुण), सूरज झोरे (1.30, 1 मि. संरक्षण व 4 गुण), विवेक ब्राम्हणे (1.20 मि. संरक्षण व 5 गुण), निखिल सोड्ये  (1.40, 1.30 मि. संरक्षण), चेतन बिका (1.20 मि. संरक्षण व 2 गुण), असा खेळ केला. पराभूत दिल्लीतर्फे मिरजुल (2 मि. संरक्षण व 9 गुण), दीपेंद्र (1,1.20 मि. संरक्षण), असा खेळ केला. 

सुवर्णमय कामगिरीची अशीही हॅट्रिक

खो-खो फेडरेशनचे सहसचिव व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांची बन्सबेरिया येथील स्पर्धेतील सहभागाची आगळी वेगळी हॅट्रिक आहे. ते म्हणाले, 1988-89 साली बंसबेरिया येथे झालेली स्पर्धा माझ्या आयुष्यातील पहिली राष्ट्रीय खो-खो स्पर्धा. खेळाडू म्हणून सहभागी होऊन रौप्यपदक प्राप्त केले. त्याच मैदानावर 2005-06 साली 17 वर्षानंतर सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून सहभाग आणि आज त्याच मैदानावर देशाच्या संघटनेचा पदाधिकारी म्हणून प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. या स्पर्धेतही महाराष्ट्रच्या दोन्ही संघांनी सुवर्णंमय कामगिरी केली. 

डॉ. अमित ठरताहेत देवदूत

खो-खो हा वेगवान खेळ म्हणून ओळखला जातो. लाल मातीमधील हा खेळ मॅटवर आला असून, खेळाडूंना मैदानावर दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी महाराष्ट्र खो-खो संघटनेने संघाबरोबर फिजिओ नेमला आहे. सांगलीचे खो-खोपटू डॉ. अमित रावटे फिजोओचे काम उत्तमरीतीने बजावत आहेत. बन्सबेरिया येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी देशभरातील अनेक खेळाडूंसाठी डॉ. अमित देवदूत बनले आहेत.

या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वच सामन्यात उत्कृष्ठ कामगिरी केली. त्यामुळे दोन्ही संघांना अपेक्षित यश मिळवता आले. यावर्षी महाराष्ट्रच्या संघांनी तिन्ही गटात सहापैकी पाच सुवर्णंपदक पटकावत पुन्हा एकदा सुवर्ण ठसा उमटवल्याचे सांगितले.  

- अ‍ॅड. गोविंद शर्मा, सचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन 


No comments:

Post a Comment