Saturday, January 14, 2023

# सामाजिक धाग्यात बांधलेली ‘पतंगबाजी’!

सामाजिक धाग्यात बांधलेली ‘पतंगबाजी’!

मकरसंक्रांत आली की, लहान थोरांना पतंगबाजीचे ‘वेड’

नगर : मकर संक्रांती म्हणजे पतंगबाजी, हा खेळ तसा खूप-खूप जुना आहे. संत नामदेव यांच्या काव्यपंगती म्हंटले की, “आणिले कागद साजीले गुडी, आकाशमंडल छोडी, पाचजनासो बात बाताडवो, चितसो दोरी राखिला” त्यांच्या या काव्यावरून लक्षात येते की, 1270 ते 1350 या काळात महाराष्ट्रात पतंगबाजी हा खेळ होता.

मकरसंक्रांत आली की, लहान थोरांना पतंगबाजीचे ‘वेड’ लागते. संत एकनाथ, संत तुकाराम, वैष्णव कवी नानदास यांच्या रचनांमध्ये पतंगाचे वर्णन आहे. शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या पतंगाच्या स्टॉलवर नागरिक गर्दी करताना दिसतात. भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बिहार, पंजाब या राज्यांमध्ये सामाजिक धार्मिक खेळ म्हणजेच पतंगबाजी खूप प्रसिद्ध आहे. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याचे सामूहिक सोहोळे साजरे होतात. अत्यंत वैविध्यपूर्ण पतंग, त्यांचे आकार -रंग, एकमेकांचे पतंग काटण्याची चढाओढ, त्यात भाग घेणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे, या सर्व गोष्टी एखाद्या मोठ्या खेळाला शोभतील अशा असतात. आता, तर त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातात. 

पतंगाची क्रेझ कवि अन् बॉलिवूडलाही!


भारतात पतंग या शब्दाचा प्रथम वापर कवी मंझर (मंझ) याने 1542 मध्ये लिहिलेल्या ‘मधुमालती’ या रचनेमध्ये आढळतो. त्यामध्ये “पांती बांधी पतंग उराई, दियो तोहि ज्यों पियमहं जाई” पतंगाचे उंच आकाशात विहरणे आणि तरीही जमिनीशी धाग्याने बांधलेले असणे, कापला गेल्यास अकाशातच गटांगळ्या खात भरकटत जाणे या गोष्टी साहित्य क्षेत्राला खूपच भावल्या, त्यामुळे अगदी आजसुद्धा भारतीय भाषांमधील वाङ्मयात, बॉलिवूडमधील चित्रपटात, कविता, गीते यामध्ये पतंगाची उपमा फार लोकप्रिय आहे.

अलरिया....! https://t.co/ukXu2pJ6xZ pic.twitter.com/8cSNaTgl4O

— altaf kadkale (@altafkadkal) January 17, 2023

नगरच्या पतंगांची गुजरातमध्ये धूम!

नगर शहरातील बागडपट्टी परिसरातील पतंग विक्रेते प्रशांत धोत्रे म्हणाले, अनेक वर्षांपासून पतंग बनवण्याचा पारंपरिक व्यावसाय घरोघरी चालतो. एकट्या बागडपट्टी परिसरातून लाखो रुपयांच्या पतंगाची विक्री होते. त्यामुळे संक्रांतीत नगर शहरातून पतंग व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुजरात राज्यात मकर संक्रांतीला आयोजित ‘पतंग महोत्सव’ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. यंदा गुजरात राज्यातून नगरच्या पतंगांना मोठी मागणी आहे. शहरात तयार होणारे ‘थ्रीडी’ पतंग यंदा गुजरातेत उंच ’भरारी’ घेत आहेत. याबरोबरच मुंबई, पुणे, नाशिक येथूनही नगरच्या कागदी पतंगांना मागणी आहे. यंदा फॅन्सी पतंग, जंबो पतंग, प्लास्टिक पतंग, स्टार पतंगांना तरूणांच्या  पसंतीला उतरत आहे. कार्टून आकारातील छोटा भीम, डोरेमॉन, मोटू-पतलू पतंगांची लहानग्यांमध्ये मोठी धूम पहायला मिळत आहे.

पतंगबाजीचा आंतरराष्ट्रीय इतिहास

इंडोनेशियातील मुना बेटावरील एका गुहेतील सुमारे 12000 वर्षांपूर्वीच्या चित्रामध्ये पतंग पाहायला मिळतो. चीनमध्ये सुमारे 7000 वर्षांपूर्वी पतंग अस्तित्वात आला. तेथे पतंगाचा वापर दोन ठिकाणांमधील अंतर मोजणे, वार्‍याची दिशा पाहणे, सैन्याला गुप्त संदेश पाठविणे अशा कामांसाठी केला जाई. न्यूझिलँड आणि पॉलीनेशियन बेटांमध्येही पतंगांची माहिती होती. रोमनांना वार्‍याच्या दिशा दाखवणारे फुग्यासारखे लांब पट्टे माहिती होते पण पतंगाविषयीची माहिती मार्को पोलो याने प्रथम युरोपात नेली आणि नंतर बोटीवरील खलाशांनी पतंग नेले. ब्राझील, चिली, कोलंबिया, गयाना येथे देखील पतंगबाजी चालते.  

पतंग उडवताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • पतंग फक्त मोकळ्या मैदानात किंवा सुरक्षित ठिकाणी उडवा, कारण अशा प्रकारे तुम्ही अनेक प्रकारचे धोके टाळू शकता.
  • छतावर पतंग उडवण्यापासून परावृत्त कराल, कारण जेव्हा तुमचे लक्ष आकाशात असते तेव्हा मागे चालल्याने पडण्याची भीती असते.
  • पतंग उडवताना परदेशी तार वापरू नका, ते पर्यावरणास अनुकूल नाहीत.
  • तुम्ही फक्त सुती धाग्याने बनवलेला मांजा वापरावा.
  • मुलांना मांजापासून दूर ठेवा कारण त्यांना दुखापत होण्याचा धोका असू शकतो
  • पतंग उडवताना चायनी मांजाचा वापर टाळा, ज्यामुळे पक्षी, माणासांचा जीवाला धोका होणार नाही. 
  • पतंगाच्या धाग्याने कोणत्याही पक्ष्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या. 

No comments:

Post a Comment